श्रीगोंदा -श्रीगोंदा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आपला कार्यकाळ संपल्यामुळे आपण राजीनामा दिला असून, तो मंजूर करण्यात यावा, असे खेंडके यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. यावेळी भाजपचे नेते बापूसाहेब गोरे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, नगरसेवक सुनील वाळके, संग्राम घोडके, सुधीर खेडकर, नंदकुमार लाढाणे, अंबादास औटी आदी उपस्थित होते. रविवारी (दि.7) खेंडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपण कार्यकाळ संपल्याने राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी दीड वर्षे शहराची सेवा करण्याची संधी मिळाली.
अनेक किचकट विषय यशस्वी रित्या हाताळत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना पदाच्या माध्यमातून आपण न्याय देऊ शकलो, याचे समाधान आहे. आगामी काळात आ. बबनराव पाचपुते व सदाशिव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासात्मक कार्यात कार्यरत राहणार आहे. या कार्यकाळात विकासात्मक कामे करताना नगराध्यक्ष, गटनेते व सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभल्याचे खेंडके यांनी म्हटले होते.