पुणे – हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही करोनाची बाधा झाली आहे. टिळेकर यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. तसेच आपली प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील आठ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. महापौरांचा अहवाल आल्यानंतर शनिवारी रात्रीच त्यांचे कुटुंबीय तसेच जवळच्या 27 जणांचे नमुने घेण्यात आले. त्यातून ही माहिती समोर आली आहे. तर, महापौरांच्या स्वीय सहायकाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.
महापौरांना करोना बाधा झाल्याचे समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आदींनी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
महापौरांच्या कुटुंबात बाधा झालेल्यांमध्ये त्यांची पत्नी, छोटी मुलगी, दोन भाऊ व भावांच्या पत्नी तसेच पुतण्या आणि पुतणी यांचा समावेश आहे. तर त्यांच्या मोठ्या मुलीचे स्वॅब व्यवस्थित घेतले गेले नसल्याने ते पुन्हा घेण्यात आले आहेत. याशिवाय आई आणि वडिलांचे अहवाल प्राप्त झाले नव्हते. दरम्यान, पत्नीला सौम्य लक्षणे असून उर्वरित सदस्यांना कोणताही त्रास जाणवत नसल्याचे सांगण्यात आले.