भोर -करोनाची पिडा आणि भोरचा तिढा सुटत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. शनिवारी (दि. 4) चार करोनाबाधित आढळल्यानंतर रविवारी (दि. 5) कापूरहोळ येथील एका बॅंक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकरी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.
दरम्यान, कापूरहोळ येथील तरुण सासवड येथील बॅंकेत कामाला असून तो रोज ये-जा करीत असे. संबंधित बॅंकेच्या पहारेकऱ्यास यापूर्वीच करोनाची बाधा झाली असून कापूरहोळचा तरुण त्याच्या संपर्कात आल्याने त्यालाही करोना झाला आहे. त्यामुळे या तरुणाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाइन केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले.
भोर शहरासह तालुक्यात आतापर्यंत 37 जणांना करोनाची बाधा झाली असून यातील 19 जणांनी करोनावर मात करीत घरी परतल्या आहेत. तर 18 जणांवर उपचार सुरू आहेत.
भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांचे आदेशा नुसार कापूरहोळ गावच्या सर्व सीमा बंद केल्या असून कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन स्थरावर दक्षता घेतली जात आहे.
– विशाल तनपुरे,
गटविकास अधिकारी, भोर तालुका पंचायत समिती