पिरंगुट -मुळशी तालुक्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवार (दि. 5) 9 अखेर मुळशी तालुक्यात 98 करोना रुग्ण आढळून आले असल्याने तालुका शतकाच्या उंबरठ्यावर ठाकला आहे.
पुणे शहराला लागून असलेल्या मुळशी तालुक्यातही करोनाचा शिरकाव झाला असल्याचे आढळून आले आहे. पिरंगुट येथे दि. 3 एप्रिल रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यांनतर खबरदारीचा उपाय म्हणून मुळशी तहसील प्रशासन, पोलिस प्रशासन, पंचायत समिती मुळशी आणि आरोग्य विभागाने चांगलीच कंबर कसून करोनाला हद्दपार केले होते. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होता. परंतु लॉकडाऊन शिथिल केला आणि नागरिकांची पुन्हा रेलचेल झल्याने दिवसेंदिवस वाढणारी करोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.
बाधितांची वाढती संख्या चिंताजनक
पिरंगुट -मुळशी तालुक्यात रविवारी (दि. 5) दिवसभरात 9 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील करोनाची रुग्ण संरख्या 98 झाली आहे. तालुक्यातील रुग्णाची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे. तालुक्यात नांदे येथे तीन (एक पुरुष, दोन महिला), भूगाव येथे दोन ( पुरुष), हिंजवडी येथे तीन (दोन महिला, एका पुरुष), तर कासारसाई येथे एक करोनाबाधित सापडला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबईतून ये-जा करणारे नागरिक, पिरंगुट, भुगाव, पौड येथील बाजारपेठेत उडालेला सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, नागरिकांची बेफिकिरी, गरज नसताना घराबाहेर पडणे आदी कारणामुळे करोनाने मुळशी तालुक्यात डोके वर काढले आहे. त्यामुळे मुळशीकरांनो सावधान राहा-सतर्क राहा-काळजी घ्या अन् करोनाला रोखा.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. गरजेचे असेल तर आणि ज्याचे काम आहे त्यांनी बाहेर पडावे. योग्य ती काळजी घ्यावी. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टनसिंगचा अवलंब करावा.
– डॉ. अजित कारंजकर, आरोग्य अधिकारी, मुळशी तालुका
मुळशी तालुक्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संचारबंदी असताना अनेक नागरिक सर्रासपणे मास्क न लावता फिरत आहे. पर्यटनास बंदी असतानाही अनेकजण शहारातून तालुक्यात येत आहे. अशा सर्वांवर पौड पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे.
– अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड