राजगुरूनगरात सार्वजनिक जनजीवनावर फारसा परिणाम नाही : कपडे, सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी
राजगुरूनगर – सलग सुट्ट्या असतानाही केवळ करोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था वगळता अन्य कोणत्याही जीवनावश्यक सेवेवर परिणाम झाला नसल्याचे चित्र राजगुरूनगर शहारत पाहावयास मिळत आहे.
दरवेळी विकेंडला पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर शहरात वाहतूककोंडी होत असते; मात्र हा रविवार (दि. 15) विना वाहतूक कोंडीचा गेला. महामार्गावरील वाहतूक जवळपास 40 टक्के कमी होती.
एकीकडे करोना व्हायरसचा परिणाम दिसत असताना दुसरीकडे मात्र; लग्न कार्यालये लग्नाचे बस्ते बांधण्यासाठी कपडे, सोने-चांदीच्या दुकानांमध्ये नागरिकांनी आज सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी केली होती. राजगुरूनगर शहरातील मोठ्या दुकानांमध्ये मुला-मुलींचे लग्नाचे बस्ते (कपडेखरेदी) करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती.
राजगुरूनगर शहरात करोनाचा परिणाम सार्वजनिक जनजीवनावर फारसा झालेला नाही. शहरातील सर्वप्रकारच्या दुकानांमध्ये जीवनावश्यकसह इतर वस्तू खरेदीसाठी नागरिक दिसत आहेत. परिमाण केवळ वाहतुकीवर आहे. अनेकजण राहत्या ठिकाणी थांबले असल्याने एसटी बस व खासगी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पुणे येथे खरेदीसाठी जाणारे ग्राहक आता राजगुरूनगर शहरातील दुकानांमध्ये खरेदी करीत असल्याने येथील दुकानांमध्ये गर्दी होत आहे. पुणे-मुंबईला जाणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे. तालुक्यात सध्या गावागावातील यात्रांचा हंगाम सुरू झाला असून शहरात नोकरीसाठी गेलेले गावाकडे येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
येथील प्रसिद्ध कापड उद्योजकाने सांगितले की, करोना व्हायरस बाबत आम्ही जागरूक असून दुकानात येणाऱ्या ग्राहकांवर बारकाईने लक्ष दिले जात आहे. तर ग्राहकही काळजी घेत दुकानात कपडे खरेदीला येत आहेत. सध्या लग्नाचा हंगाम असल्याने संख्या वाढली आहे मुळात तालुक्यात उष्ण तापमान आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण नसल्याने नागरिक ग्राहकांमध्ये भीती राहिली नाही.
मॉलबंदच्या सूचना मिळाल्या नाहीत
राजगुरूनगर शहरात तीन ते चार छोटे मॉल आहेत. मात्र करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मॉल बंद ठेवण्याच्या कोणत्याची सूचना आदेश मिळाले. नसल्याचे मॉलच्या मालकांनी सांगितले. राजगुरूनगर शहरातील छोट्यामोठ्या मॉलमध्ये दिवसभरात कमालीची शांतता होती. सकाळी आणि दुपारी नेहमीपेक्षा जवळपास 50 टक्के गर्दी कमी दिसली. मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना करोना बाबत माहिती दिली जात असून खबरदारीचा उपाययोजना केली जात आहे.