- महापालिका आस्थापना ः एकाही मोठ्या अधिकाऱ्याचा अर्ज नाही
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या बदलीच्या प्रस्तावाला कर्मचाऱ्यांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामध्ये वर्ग एक ते वर्ग चार मधील बदल्यांसाठी एकूण 149 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अर्ज प्रशासन विभागाकडे प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे वर्ग एकमध्ये एकाच अधिकाऱ्याने बदलीसाठी प्रशासनाला विनंती केली आहे. मात्र, यामध्ये एकाही मोठ्या अधिकारी किंवा अभियंत्याने बदलीसाठी अर्ज केला नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र ठरणारे तसेच वैयक्तिक व वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पाठविण्याचे परिपत्रक प्रशासन विभागाने 22 जानेवारी रोजी काढले होते.
यामध्ये गट “अ’ ते “क’ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 31 जानेवारीपर्यंत बदलीस पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार वर्ग एक मधील एका अधिकाऱ्याने बदलीसाठी अर्ज सादर केला आहे. तर, वर्ग दोन मधील 52, वर्ग तीन मधील 64 आणि वर्ग चार मधील 23 कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केला आहे.
यामध्ये एकाही मोठ्या अधिकाऱ्यांने व अभियंत्याने बदलीसाठी अर्ज केला नाही. केवळ एका उपअभियंत्याने बदलीसाठी अर्ज केला आहे. तर 18 कनिष्ठ अभियंत्यांना सध्या कार्यरत असलेल्या विभागातून दुसऱ्या ठिकाणी बदली हवी आहे. तसेच 14 शिपायांनाही दुसऱ्या ठिकाणी काम करायचे आहे. त्यांनीही बदलीसाठी अर्ज केला आहे. महापालिका प्रशासन विभागाने प्रत्येक विभाग प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या या अर्जांची तपासणी करून बदलीस पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. अशी माहिती दिली.
यांना हवी आहे बदली
महापालिकेतील उपअभियंता 1, कार्यालयीन अधीक्षक 4, मुख्य लिपिक 19, लिपिक 36, उपलेखापाल 2, सहायक भांडारपाल 3, आरोग्य निरीक्षक 5, वीज पर्यवेक्षक 1, प्लंबर 1, स्टाफनर्स 4, लॅब टेक्निशियन 1, लघुलेखक 2, तारतंत्री 2, वाहनचालक 4, एम.पी.डब्लू 1, मोटार पंप ऑपरेटर 3, कनिष्ठ अभियंता 18, कॉम्प्युटर ऑपरेटर 4, वीजतंत्री 1, फार्मासिस्ट 1, आरेखक 1, शिपाई 14, मजूर 9 अशी एकूण वर्ग एक ते वर्ग चार मधील 149 जणांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत.