शिरूर : शिरूर शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव थांबता थांबेना. आज पुन्हा शिरूर शहरात कोरोनाबाधित व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेला त्याचा २७ वर्षाचा मुलगा व रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील सरदार पेठ येथील ३७ वर्षीय कामगार असे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.
दोघांच्या संपर्कात आलेले ५९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. यामुळे आता शिरूर शहरात कोरोना बाधितांचे आकडा ३३ एवढा झाला आहे.
व्यापाऱ्याच्या मुलाला लक्षणे नसल्याने त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, कंपनी कामगाराला शिरूर येथील कॉविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत. यामुळे शहरात घबराट पसरली असून बाधितांच्या संपर्कात कोण कोण आले आहे याचा शोध घेण्याचे काम शिरूर नगर परिषदेच्या वतीने सुरू आहे.
शिरूर शहरात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण 33 रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. शिरूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून प्रत्येक एरियामध्ये आता रुग्ण आढळू लागले आहेत. शिरूर येथील आडत बाजार येथे व्यापारी व तो रहात असलेला सुभाष चौक परिसर शिरूर नगर परिषदेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
तर सरदार पेठ येथे राहणारा कामगार येथीलही परिसर नगर परिषदेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असल्याची माहिती शिरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी देऊन कोरोनाची साखळी तूटावी यासाठी शहरात 19 जुलै ते 28 जुलै पर्यंत लॉकडाऊन केले असल्याचे त्यांनी सांगितले.