लाहोर -पाकिस्तान महिला क्रिकेट महिला संघातील तीन खेळाडू पॉझिटीव्ह आढळले आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) ही माहिती दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पूर्वतयारीच्या उद्देशाने संघाचे खेळाडू कराचीतील हनिफ महंमद हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये सराव करत होते. या सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
मात्र, पीसीबीने या खेळाडूंच्या नावांची माहिती दिलेली नाही. ज्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे, त्यांना आता 10 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. पुढील महिन्यात 6 नोव्हेंबरला त्यांचा विलगीकरण कालावधी संपेल.
करोनाच्या नियमांनुसार संघातील उर्वरित खेळाडूंना 2 नोव्हेंबरपर्यंत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
या खेळाडूंना प्रत्येक दिवशी एक चाचणी द्यावी लागेल. शिबिरासाठी तयार करण्यात आलेल्या बायोबबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मे महिन्यात प्रत्येकाचे करोना लसीकरण करण्यात
आले होते.