मुंबई – क्रिकेट किंवा राजकारणाध्ये लूज बॉल आला की मोठा फटका मारायचा असतो. पण फटका मारताना विकेट टाकायची नसते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वानखेडे मैदानावर लगावला आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमधील आदरातीथ्य कक्षाला माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचे, तर नॉर्थ स्टॅण्डला दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमधील नॉर्थ स्टॅण्डचे दिलीप वेंगसरकर असे नामकरण करण्यात आले आहे. यावेळी क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने वेंगसरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, क्रिकेट जनतेच्या रक्तात भिनले आहे. मलाही वाटायचे क्रिकेटर व्हावे, पण ते शक्य झाले नाही. पण मी मैदानात उतरलो आहे. ते सुद्धा जगविख्यात संघातून उतरलो आहे. फक्त इथल्या धावपट्टीसोबत माझी आठवण आहे. क्रिकेटमध्ये असो किंवा राजकारणामध्ये असो लूज बॉल आला का फटका मारायचा. मात्र विकेट टाकायची नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
शमीवरील टीका अशोभनीय
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या पराभवावर वक्तव्य केले. भारतीय संघाच्या पराभवानंतर शमीवर टीका करण्यात येत होती. परंतु त्या टीका अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आपण आता येणाऱ्या सामन्यांमध्ये नक्की जिंकू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच क्रिकेट स्टेडियममध्ये व्हीआयपी स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट बघण्यापेक्षा स्टॅण्डमध्ये बसून क्रिकेट बघणाऱ्यांना ते अधिक कळते, असे सांगत त्यांनी कोपरखळी मारली.