नवी दिल्ली – देशात गर्भवती महिलांना करोना लस द्यावी, ही तज्ज्ञ समितीची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्य केली आहे. यामुळे गर्भवती महिलांच्या करोना लसीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19बाधित गर्भवतींना झालेल्या बाळांपैकी 95 टक्के बाळांचे आरोग्य जन्मतः चांगले होते. मात्र काही करोनोबाधित गर्भवतींच्या बाबतीत वेळेआधी बाळांचा जन्म होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे बाळाचे वजन 2.5 किलोपेक्षा कमी असू शकते आणि काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये बाळाचा जन्माआधीच मृत्यू होऊ शकतो.
अन्य व्यक्तींप्रमाणेच गर्भवती महिलांनाही लसीकरणानंतर काही साइड इफेक्ट्स जाणवू शकतात. त्यात सौम्य ताप, इंजेक्शनच्या जागी वेदना किंवा एक ते तीन दिवस अस्वस्थता आदी लक्षणांचा समावेश आहे. दीर्घकालीन साइड इफेक्ट्स आणि बाळासाठी लशीची सुरक्षितता यांबद्दल अद्याप अभ्यास झालेला नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
तसेच गर्भवती महिलांना करोना लस घ्यायची असल्यास त्यांना कोविन (CoWIN) पोर्टलवर नोंदणी करावी. किंवा त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लस घेण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.