पुणे – पंतप्रधान मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून त्याअंतर्गत आतापर्यंत गेल्या पाच वर्षांत पुणे शहरात 64 हजार 508 महिलांना प्रत्येकी पाच हजार मिळून एकूण 32 कोटी 25 लाख रूपयांचा लाभ मिळाला आहे. तर आणखी 3 हजार 976 महिला लाभाच्या प्रक्रियेत आहेत.
बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आणि त्याबरोबरच मातेचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. शहरात दरवर्षी 25 ते 26 हजार महिलांची प्रसूती होते. बहुतांश प्रसूती या शासकीय केंद्रांत होतात. तर 40 टक्के प्रसूती या खासगी रुणालयात होतात.
अशी आहे योजना
टप्पा 1 : कुटुंबातील जोडप्याच्या पहिल्या अपत्याचा गर्भ राहिल्यापासून त्याचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत महिलेला 5 हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांत देण्यात येते. गरोदरपणाची नोंद “एएनएम’ यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर 100 दिवसांच्या आत केल्यास पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये मिळतात.
टप्पा 2 : सहा महिन्यानंतर परंतु गरोदरपणात किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी, सोनोग्राफी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळतात.
टप्पा 3 : तिसरा आणि अंतिम 2 हजार रुपयांचा हप्ता बाळाचे जन्मनोंद प्रमाणपत्र तसेच 14 आठवड्यापर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळतो. लाभार्थीनी अटींची पूर्तता केल्यानंतर 30 दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा करण्यात येते.
ही कागदपत्रे आवश्यक
* लाभार्थी आणि पतीचे आधारकार्ड
* लाभार्थीचे आधार संलग्न बॅंक खाते
* गरोदरपणाची सरकारी आरोग्य संस्थेत 150 दिवसांचे आत नोंद
* सरकारी रुग्णालयात गरोदर कालावधीत तपासणी
* बाळाचे जन्मनोंदणी दाखला आणि प्राथमिक लसीकरण प्रमाणपत्र
येथे मिळेल माहिती
आपल्या कार्यक्षेत्रातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ता, आरोग्य सेविका किंवा कोणतीही सरकारी आरोग्य सेवा संस्था येथे संपर्क करावा.