नवी दिल्ली – कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस टोचली जाणार असून यावर येणारा खर्च केंद्र सरकारकडून केला जाईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण केले जाणार आहे.
पंतप्रधानांनी आज कोविड लसीकरणाच्या मुद्यावर देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. 16 जानेवारीपासून लसीकरणारला सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस टोचली जाईल. करोनाची लस सर्वात आधी करोना योद्ध्यांना देण्यात येईल.
पंतप्रधान म्हणाले की, सरकारने लसीकरणाचे ड्राय रन केले होते. ते यशस्वी ठरले. ही एक उपलब्धी आहे. लस देणाऱ्याची आणि लस टोचली गेली त्यांचा डाटा तयार होणे आवश्यक आहे. लसीकरणाचा रिअल टाईम डेटा ऍपवर अपलोड करण्यास प्राधान्य द्यावे, अन्यथा नुकसान होईल, असेही ते म्हणाले.
भारतात तयार झालेली लस अन्य देशातील लसीच्या तुलनेत स्वस्त आहे. भारताला लसीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागले असते तर काय परिस्थिती आली असती याचा विचार न केलेलाच बरा. भारताचा अनुभव कामी आला असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
को विन नावाचे डिजिटल ऍप बनवण्यात आले आहे. आधार कार्डद्वारे याची नोंदणी केली जाणार आहे. करोनाची लस मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा त्या व्यक्तीला लस कधी दिली जाईल, याचीही यात माहिती असणार आहे. ऍपवर तातडीने प्रमाणपत्र मिळेल. त्यावरुन कोणाला लस मिळेल, हे समजेल. भारत जे करणार आहे, त्याचे इतर देश अनुसरण करतील, त्यामुळे आपली जबाबदारी महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.