ढाका – जगभर पसरलेल्या करोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता त्याचा क्रिकेटमध्येही शिरकाव झाल्याचे स्पष्ट होत आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अशिकूर रेहमान यांनाही करोनाची लागण झाल्याचे खुद्द त्यांनीच जाहीर केले आहे. त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचारही सुरू झाले आहेत.
घसा खवखवत असल्याने मी वैद्यकीय तज्ज्ञांची भेट घेतली होती. त्यांनी मला प्रमुख चाचण्यांसह करोनाचीही चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ही चाचणी झाली व त्याच्या अहवालात मला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने रुग्णालयात दाखल झालो आहे, असे रेहमान यांनीच माध्यमांना सांगितले.
रेहमान यांनी बांगलादेशकडून 15 स्थानिक तर 18 प्रथम दर्जाचे सामने खेळले आहेत. 2002 साली रेहमान बांगलादेशच्या 19 वर्षांखालील संघाकडूनही त्यांनी खेळ केला होता. मात्र, देशाकडून खेळण्याचे त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर ते प्रशिक्षक म्हणुन कार्यरत झाले.