कोरेगाव-(प्रतिनिधी)-कोरेगाव शहरापासून जवळच असणाऱ्या कुमठे येथील युवकाचा करोना रिपोर्ट शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाल्याने कुमठे गावासह कोरेगाव शहरामध्ये घबराट निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार कुमठे येथे सापडलेला करोना रुग्ण दि.११ रोजी मुंबई (वाशी) येथून भाजीपाल्याच्या गाडीमधून शिवथर (ता.सातारा) येथे आल्याचे समजते. काही वेळ येथे तो थांबला होता. दरम्यान, त्याला शिवथर येथून आणण्यासाठी त्या रुग्णाचा भाऊ कुमठे येथून दुचाकीवर आणण्यासाठी गेला होता. गावामध्ये प्रवेश करत असतानाच ग्रामस्तरीय समितीकडून त्याची चौकशी करून त्याला घरी जाऊ न देता त्याच्यावर कोरेगाव पोलोस ठाण्यात गुन्हा दाखल करून जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले.
दरम्यान त्याच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसू लागल्याने दि. १३ रोजी कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात त्याचा स्त्राव घेऊन ब्रह्मपुरी (ता.कोरेगाव) येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने कुमठेसह कोरेगाव शहरात घबराट निर्माण झाली होती.