विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या होणार करोना चाचण्या

सातारा पालिका, पंचायत समितीकडून कारवाईसाठी स्वतंत्र पथके

सातारा (प्रतिनिधी) – सातारा तालुक्‍यात करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या आता करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. त्याची जबाबदारी सातारा पालिका आणि पंचायत समितीवर सोपवण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली. रॅपिड अँटिजेन टेस्ट करणारी व्हॅन शहरात फिरत असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पहिल्या दिवशी सात जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.

याबाबतचा आदेश सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा तहसीलदार आशा होळकर यांनी काढला आहे. हा आदेश मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी तत्काळ वाहन उपलब्ध करून एक डॉक्‍टर, एक तंत्रज्ञ, एक पोलीस व एक नर्स असे पथक तयार केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडासह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली, तरीही अशा लोकांची संख्या कमी होत नव्हती. आरोग्य विभागाकडे आलेल्या अहवालानुसार सातारा शहरात 178 व तालुक्‍यात 477, असे एकूण 655 रुग्ण आज आढळले आहेत. तालुक्‍यात कंटेन्मेंट झोन 281 वर पोहोचले आहेत. 

करोनाचे संक्रमण झपाट्याने पसरत असताना, लॉकडाऊनमध्ये रस्त्यावरची गर्दी कमी होईनाशी झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांच्या चाचण्या करायचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिका व पंचायत समिती प्रशासनाने पोलीस आणि आरोग्य विभागाच्या मदतीने या चाचण्या करायच्या आहेत. 

त्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे निर्देश आहेत. सातारा शहरात गुरुवारी दुपारी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या तात्काळ रॅपिड अँटिजेन टेस्टस्‌ करण्यात आल्या. त्यात कोणाचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही. लोकांना करोना संक्रमणाचे गांभीर्य कळावे, हा या मोहिमेचा हेतू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दादासाहेब पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.