नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लॉकडाऊन असतानां देखील कोरोनबाधितांची संख्या कमी होत नाहीय. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. बॉर्डर सेक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) ६७ जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिल्लीत तैनात असताना त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.
त्यात दिल्लीच्या जामिया विद्यापीठ परिसरातील तैनात असणाऱ्या जवानांचा सर्वाधिक समावेश आहे. याबाबत मंगळवारी बॉर्डर सेक्युरिटी फोर्सने माहिती दिली आहे. तर काही जवान त्रिपुरा राज्यात तैनात असताना त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्रिपुराच्या एका बीएसएफ कॅम्पमध्ये १० जवानांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जवानांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे. तर ३ रुग्ण बीएसएफ जवानांच्या परिवारातील सदस्य आहेत. त्यात पत्नी आणि जवानाच्या दोन मुलांचा समावेश आहे. त्यामुळे त्रिपुऱ्यात एकूण कोरोनाबाधित जवानांचा आकडा २४ वर पोहचला आहे.
दिल्लीत सर्वाधिक कोरोना संक्रमित जवान आढळले आहेत. आतापर्यंत दिल्लीत ४१ जवानांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यापैकी सर्वाधिक जवान दिल्लीच्या जामिया विद्यापीठ परिसरात तैनात होते. ३२ जवान जामिया परिसरातील तर ८ जवान आरके पुरम रुग्णालयाशी संबंधित असल्याची माहिती बीएसएफच्या दिली आहे. त्यात सुटीवर गेलेल्या एका जवानांचा देखील समावेश असल्याचं बीएसएफनं सांगितलं आहे.