वसुंधरा दिन विशेष: ‘हा’ नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे!

“मरणाचं ऊन आहे, करपून पापड व्हायचा”, “कसली ही थंडी बाई, आता फक्त बर्फ पडायचं राहिलंय”, “यंदा शाळेभोवती तळे साचून खरोखरच सुट्टी मिळाली की” या वर्षात ऐकलेली ही वाक्यं! उपहासात्मक वाटतील, ऐकल्या ऐकल्या हसू येईल, आपण हसलोही असू. पण आता ही हसण्यावारी घेण्याची गोष्ट राहिलेली नाही. उद्या खरंच एखाद्याचा करपून पापड झाला तर नवल वाटायला नको.

माणसाने स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गाकडून ओरबाडून घेतलेलं त्याचं सौंदर्य, स्वातंत्र्य तो एक ना एक दिवस परत तसंच ओरबाडून घेणारच ना! निसर्गाच्या उन्मादापासून, रौद्ररूपापासून आपण अजूनही अनभिज्ञच आहोत. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण आपल्या चुका सुधारू शकतो. कसं ते आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जाणून घेऊया.

२२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. अमेरिकन सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांनी एका मोठ्या पर्यावरण- रक्षणाच्या आंदोलनाची हाक दिली. निमित्त होतं अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरा इथल्या तेलगळतीमुळे निर्माण झालेल्या प्रदुषणाचं! २२ एप्रिल १९७० साली अमेरिकेत दोन कोटी नागरिकांच्या उपस्थितीत पहिला वसुंधरा दिवस साजरा झाला. अमेरिकेतल्या हजारो विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने आणि आंदोलने करून पर्यवरणासंबंधी प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. आज हा दिवस अनेक देशांमध्ये साजरा केला जातो.

दरवर्षी एक थीम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची पृथ्वी दिवसाची थीम आहे – क्लायमेट अ‍ॅक्शन म्हणजे हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी, त्याच्या परिणामांचा सामना करण्यासाठी कृतीकार्यक्रम राबवणे. पण त्याआधी सर्वसामान्य नागरिकांना आपल्यावर होणारा हवामान बदलाचा परिणाम समजायला हवा. हवामान बदल म्हणजे ओझोनच्या थराला छिद्र पडलं यातून बाहेर यायला हवं. अर्थात हाही हवामानबदलाचा एक गंभीर परिणाम आहे, ज्याचे दिर्घकालीन परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेतच. पण या व्यतिरिक्तही हवामानबदलाचे परिणाम आपण भोगत आहोत.

युनायटेड नेशन्सच्या हवामान बदलासंबंधीच्या (UNFCC) एका रिपोर्टनुसार, येत्या काही दशकांमध्ये, विशेषत: विकसनशील राष्ट्रांमधील लाखो लोक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे आणि आरोग्याच्या समस्येमुळे मृत्युमुखी पडतील असा अंदाज आहे. ऊन, वारा, थंडी, पावसाची अनिश्चितता, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, त्यामुळे येणारे पूर, भूकंप हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत.

माणसाच्या अनियंत्रित कृत्यांमुळे निसर्गाचे भरून न येणारे जे नुकसान झाले आहे त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला हवामान बदलाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. हे हवामान बदल रोखण्यासाठी जर वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत तर मात्र आपण आत्ता प्रगतीच्या ज्या टप्प्यावर आहोत तिथून दूरवर मागे फेकले जाऊ. या उपाययोजना जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर घडणे अपेक्षित आहे.

या उपाययोजनांची पहिली पायरी ठरली २०१५ मध्ये झालेला पॅरिस करार. या करारानुसार सर्व देशांनी हरितवायू उत्सर्जन, जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी कायदेशीर उपाय करण्याचे मान्य केले. ही एक सकारात्मक पायरी असली तरी स्थानिक पातळीवर या उपायांची, कायद्यांची अंमलबजावणी होते का? ही विचार करण्याची बाब आहे.

पर्यावरणविषयक प्रश्नांची तीव्रता आणि सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणांची अंमलबजावणी पाहता अजूनही पर्यावरणाला गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. लवकरात लवकर या विषयी ठोस कृती केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. लहानपणी शाळेत “हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे” ही कविता म्हणत असताना डोळ्यात आलेले अश्रु जर अजूनही जिवंत असतील तर खरंच या वसुंधरेला वाचवण्यात यश येऊ शकते.

– वैष्णवी सविता सुनिल, कॉलेज रिपोर्टर

संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.