शिराळा : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना चाचणी अहवाल कोल्हापुरात पॉझिटिव्ह आला, तर त्याच महिलेचा कोरोना चाचणी अहवाल सांगलीमध्ये निगेटिव्ह मिळाला. एकंदरीत या प्रकाराने खाजगी आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
चिकुर्डे येथील बाजार गल्लीत रहात असलेल्या एका 80 वर्षीय वृद्धेचा कोरोना पॉझिटिव असल्याचा अहवाल सोमवारी (दि.27) प्राप्त झाला असल्याची माहिती चिकुर्डे आपत्कालीन समितीच्या वतीने देण्यात आली होती. संबंधित महिला गेल्या 5 दिवसापासून दम्याच्या आजाराने त्रस्त होती. त्यामुळे महिलेच्या कुटुंबियांकडून त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना संबंधित महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणीअंती या महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. संबंधित महिलेवरती कोरोना उपचार करणे गरजेचे असल्याचे कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयाकडून सांगण्यात आले. कोरोना झाल्याचे निष्पन्न होताच कुटुंबीय भयभीत झाले होते.
एकंदरीत या वयस्कर महिलेस कोरोना होण्याचे नेमके कारण संभ्रमीत करणारे होते. कारण ही महिला 80 वर्षाची वृद्ध असल्याने त्यांचे बाहेर फिरणे अजिबातच नव्हते. त्यामुळे कुटुंबियांना सुरुवातीला यावरती विश्वासच बसला नाही. परंतु रुग्णालयाकडून चाचणी अहवाल कोरोना मिळाला असल्याचे ठामपणे सांगण्यात आल्याने कुटुंबियांनी त्यावरती विश्वास ठेवून उपचाराची तयारी दर्शवली होती. दरम्यानच्या काळात संबंधित कुटुंबीयांच्या नजीकच्या काही लोकांकडून वृद्ध आजींना सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी त्यांना सांगली येथे उपचारासाठी दाखल केले. सांगली येथील रुग्णालयात कोल्हापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले होते. असे असतानाही सांगली येथील रूग्णालयात पुन्हा संबंधित महिलेचा कोरोना चाचणी अहवाल तपासण्यात आला. मंगळवारी (दि.28) कोरोना चाचणी अहवाल सांगली येथील रुग्णालयाच्या हातात मिळताच त्यांच्याकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यांनी आजी कोरोना पॉझिटिव्ह नसून त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
सांगली येथील रुग्णालयातील डॉक्टरांकडून संबंधित अहवाल कुटुंबीयांच्याकडे सोपवण्यात आला आहे. रुग्णाला आता जनरल वॉर्डमध्ये दम्याच्या आजारावरती उपचार सुरू करण्यात आले आहेत. एकंदरीत या प्रकाराने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.