पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी – शहरात करोना रुग्णांची संख्या खूपच झपाट्याने वाढत आहे. रोज बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आठशे ते अकराशे दरम्यान असल्याने महापालिकेकडून आता रुग्ण कोणत्या भागातील आहेत, हे जाहीर केले जात नाही. यामुळे लक्षणे नसलेले आणि चाचणी न केलेले रुग्ण देखील फिरत असण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेने कोणत्या प्रभागात सध्या किती रुग्ण आहेत, याची माहिती जाहीर करावी, जेणे करुन उद्योगांना देखील काळजी घेता येईल, अशी मागणी पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
चेंबरचे अध्यक्ष ऍड. आप्पासाहेब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात उद्योगांना परवानगी दिली आहे. उद्योगांमध्ये करोनाचा उद्रेक होऊन उद्योग पुन्हा बंद होऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
शहरात कोणत्या भागात सध्या किती रुग्ण आहेत हे जाहीर केल्यास उद्योजकांना कामगारांना कामावर बोलविण्यात अडचण येणार नाही. कदाचित लागण झालेले कामगार अजाणतेपणी कामावर आल्याने इतर कामगारांना, व्यवस्थापनास आणि उद्योजकांना देखील बाधा होण्याची शक्यता आहे. कोणत्या भागात किती रुग्ण आहेत, हे कळल्यास उद्योजक देखील आपल्या कामगारांची काळजी घेऊ शकतील.
कोट्यवधी रुपये खर्चूनही मनपा आणि सरकार करोनाला पायबंद घालण्यात अपयशी ठरत आहे. यामुळे आता नागरिक, राजकीय, सामाजिक संस्था व उद्योगांची मदत घेण्याची गरज आहे. आकड्यांच्या बाबतीत पारदर्शकता बाळगल्यास सर्वांच्या प्रयत्नांना करोनाला रोखता येऊ शकते. अन्यथा करोना असाच पसरत राहिल्यास उद्योगांवरील संकट अजूनच तीव्र होण्याची शक्यता आहे, असेही चेंबरच्या वतीने अध्यक्ष ऍड. आप्पासाहेब शिंदे, उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल, सचिव रंगनाथ गोडगे-पाटील यांनी म्हटले आहे.