थेऊर (प्रतिनिधी) : कुंजीरवाडी ता.हवेली हद्दीतील थेऊरफाटा जवळ असलेल्या एका वस्तीवरील ३५ वर्षाच्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. शेवाळेवाडी ( ता. हवेली ) येथील एका खाजगी रुग्नालयात उपचार घेत असताना हा प्रकार उघडकीस आला असून हडपसर गाडीतळ येथील एका रुग्णालयातही या रुग्णाने उपचार घेतले असून त्याचे संपर्कात आलेल्यांची माहिती प्रशासन घेत आहे.
कोरोनाची लागण झालेला हा तरुण हा कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पहिला रुग्ण ठरला आहे. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती प्रशासन घेत असून त्यांची तपासणी सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सदर युवकाचा शुक्रवार ( ८ मे ) रोजी हडपसर – सासवड राज्यमार्गावर वडकी ( ता हवेली ) हद्दीत दुपारी ४ वाजण्याच्या सुमारांस अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी वडकी येथील युवकांनी हडपसर गाडीतळ येथील एका खाजगी रुग्णालयांत दाखल केले होते. परंतू तेथील उपचार समाधानकारक न वाटल्याने नातेवाईकांनी त्याला शनिवार ( ९ मे ) रोजी दुपारी शेवाळेवाडी येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथे करण्यात आलेल्या तपासणीत तो कोरोना बाधीत असल्याचे रविवार ( १० मे ) रोजी निष्पन्न झाले.
कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहबुब लकडे यांनी दिलेल्या माहिती नुसार तरुणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळताच थेऊर फाट्यापासुन तीन किलो मिटरचा भाग प्रंतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर करण्यात आला आहे. तात्काळ ग्रामपंचायतीकडून या परीसराचे निर्जतुकीरण करण्यात आले आहे. तसेच त्याचे संपर्कात आलेले आई – वडील, पत्नी, मुलगा, बहिण व भाची या सहा जणांना तपासणी साठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुण लॉकडाऊन जाहीर झाल्यापासुन घरी होता. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात या तरुणास रूग्णालयात नेण्यासाठी मदत करणारे वडकी येथील तरुण, गाडीतळ व शेवाळेवाडी येथील खाजगी रुग्णालय या सर्वांची माहिती घेण्यात येणार आहे.