करोनापासून बचावाचे मास्क सिंगापूरहून पुण्यात

100 ते 300 रुपये किंमत : चार थर, रसायनांचा वापर केलेले तीन मास्क उपलब्ध

पुणे – आतापर्यंत करोनाचे भारतात केरळमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात विशेष कक्ष स्थापन केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारात सिंगापूरहून आधुनिक मास्क दाखल झाले आहेत. मेडीकलमध्ये हे मास्क 100 ते 300 रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता केंद्र व राज्य सरकार कमालीची खबरदारी घेत आहे. आरोग्य विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, पुण्यातील विविध मेडीकलमध्ये उपलब्ध असलेला साधा मास्क आणि नव्याने दाखल झालेल्या मास्कमध्ये बराच फरक आहे.

सध्या मेडीकलमध्ये 10 ते 20 रुपयांदरम्यानचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र, करोनाला रोखण्यासाठी चार थर व रसायनांचा वापर केलेले विविध प्रकारचे तीन मास्क सिंगापूरहून उपलब्ध झाले आहेत.

पक्ष्यांना धान्य टाकण्यास मनाई
ओंकारेश्‍वरच्या पुलावर फिरायला अथवा दर्शनासाठी येणे हा बहुतांशी पुणेकरांच्या दिनक्रमाचा एक भाग आहे. याठिकाणी ओंकारेश्‍वर देवस्थानची मोकळी जागा आहे. याठिकाणी निसर्गात मुक्‍तपणे विहार करणारे पक्षी गर्दी करतात. त्यामध्ये पारवे, चिमण्या, कबुतरे, कावळे यांचा समावेश आहे. याठिकाणी जमा होणाऱ्या पक्ष्यांना दररोज फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून खाण्याकरिता धान्य टाकले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या वाढत आहे. मात्र, या पक्ष्यांच्या माध्यमातून जंतुंचा प्रसार होत असल्याने करोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर याठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांकडून होणाऱ्या जंतुंचा प्रसार मानवी आरोग्यास हानीकारक ठरू शकतो, असा अंदाज वर्तवित देवस्थानच्या वतीने या पक्ष्यांना धान्य टाकण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सिंगापूरहून विविध प्रकारचे मास्क आयात केले आहेत. ते युज ऍन्ड थ्रो या प्रकारातील असून, साध्या मास्कच्या तुलनेत या मास्कमध्ये प्रतिरोधकाचे चार थर दिले असल्याने त्यांची उपयुक्‍तता अनेक पटींने वाढली आहे. तसेच. त्यामधील रसायनांचा वापर जंतु संसर्गापासून रोखण्याचे काम करतो.
– दिनेश चौधरी, लक्ष्मी मेडिकल, येरवडा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.