गरीब रुग्णांवर पदरमोड करण्याची वेळ
पुणे – महापालिकेकडून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना एक्स रे काढून देण्यासाठी गाडीखाना येथे बसवलेले एक्स रे मशीन गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना पदरमोड करून खासगी लॅबमध्ये जाण्याची वेळ आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या दीड वर्षांत वारंवार ही बाब समोर आल्यानंतरही आरोग्य विभागाकडून त्याकडे दुलर्क्ष केले आहे. तर कमला नेहरू रुग्णालयात असलेले मशीन पालिकेने एका खासगी संस्थेला चालविण्यास दिले आहे. त्यामुळे तातडीने एक्स रे सुविधा सुरू करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
महानगरपालिकेच्या गाडीखाना येथील दवाखान्यात 10 वर्षांपूर्वी एक्स रे मशीन बसवले, यावर गरजू रुग्णांना मोफत एक्स रे काढून मिळण्याची सोय होत होती. दीड वर्षांपूर्वी हे मशीन बंद आहे. संपूर्ण पुणे शहरात गरीब व गरजू रुग्णांना विनामूल्य एक्स रे काढून मिळणारे हे एकच मशीन आहे. कमला नेहरु रुग्णालयात अद्ययावत डिजिटल एक्स रे मशीन होते जे दीड वर्षांपूर्वी क्रस्ना लॅबोरेटरीला चालविण्यासाठी देण्यात आले असून त्यांच्याकडून या सेवेसाठी शुल्क आकारले जाते.