चेन्नई – टॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता विजयची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली आहे. ही चौकशी सिनेमाशी निगडीत आयकराशी निगडीत होती. विजय त्याच्या आगामी मास्टर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात व्यस्त आहे. चौकशी करण्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी थेट विजयच्या सेटवर गेले. यासंबंधी विजयसह एजीएस सिनेमा आणि सिनेमाचे निर्माते अंबू चेलियन यांचीही चौकशी करणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत आयटी विभागाने ६५ कोटींची रक्कम जप्त केली आहे.
Sources: Money recovered from the financer of Tamil actor Vijay during Income Tax Department raids. https://t.co/IBIl5mouYl pic.twitter.com/tbOIX76X3I
— ANI (@ANI) February 6, 2020
एजीएस कंपनीअंतर्गत विजयच्या बिगिल या सिनेमाची निर्मिती झाली होती. या सिनेमाने ३०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. सोशल मीडियावरही या सिनेमाच्या मिळकतीची खूप चर्चा रंगली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात गडबड असल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आहे.
प्राप्तिकर विभागाने बुधवारी करचुकवेगिरीच्या संशयावरून तामिळनाडूत 38 ठिकाणी छापे टाकले. छाप्यांची कारवाई दोन दिवस चालणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. कारवाई पूर्ण झाल्यानंतरच प्राप्तिकर विभागाकडून त्याविषयी तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. छाप्यांवेळी प्राप्तिकर विभागाच्या पथकांना तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा पुरवली.
दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या छापासत्राचे लक्ष्य तामिळ चित्रपटसृष्टीशी संबंधित मंडळी ठरली आहेत. चित्रपटांना पैसा पुरवणाऱ्या एका व्यक्तीच्या ठिकाणावर टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी बेहिशेबी रोकड सापडली. विजयच्या घराचीही तपासणी करण्यात आली. त्या कारवाईवेळी विजय चित्रिकरणासाठी चेन्नईबाहेर होता. छाप्याची माहिती मिळाल्यावर तो घरी परतला. तामिळ चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या एका संस्थेवर आणि काही चित्रपट वितरकांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत.