खोडद -मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी 3 महिन्यांपासून बंद असलेल्या सलून व्यावसायिकांना सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून दुकाने उघडण्याची परवानगी दिली होती; परंतु अवघ्या एकच दिवसात हीच दुकाने पुन्हा बंद करण्याची वेळ आल्यामुळे करोनाने सलून व्यावसायिकांनाही एप्रिल फूल केल्याचे चित्र जुन्नर तालुक्यांमध्ये निर्माण झाले आहे.
करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, हॉटेल, व्यवसाय, कारखाने बंद करण्यात आले. यामध्ये हातावर पोट भरणाऱ्या 12 पगड जातींपैकी एक अशा न्हावी समाजाची सलून दुकानेही 3 महिन्यांपासून बंद असल्यामुळे अनेक छोट्या सलून व्यावसायिकांवर उपाशी मरण्याची वेळ आली होती.
काही दिवसांपूर्वी नाभिक समाजाच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना व्यवसाय चालू करण्यासंबंधी विनंती केली असता, त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सलून व्यवसाय सुरू करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या.
नाभिक संघटनेने तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना निवेदन देऊन दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. बंद दुकाने स्वच्छ करून सॅनिटायझेशन केली. अनेक दुकानदारांनी प्रत्येक ग्राहकासाठी वेगवेगळे नॅपकीन, दाढीचे समान, हॅन्डग्लोज, मास्क आणून ठेवले होते.
दुसऱ्यादिवशी करोनाचे रुग्ण सापडू लागले. नारायणगावसारख्या ठिकाणी सावरगाव येथून एक बाधित रुग्ण येऊन अनेक दुकाने फिरला. त्यामुळे सुरू असलेली दुकाने, अनेक गावे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली.