मुंबई – देशभरातील स्थलांतरितांच्या अतिशय क्लेषदायक अवस्थांच्या बातम्या दिसत असताना, अशीच एक घटना बुधवारी बिहारमधील मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर बघायला मिळाली. अत्यंत हालाखीचा प्रवास, उपासमार, पायपीट आणि उन्हातान्हाचे चटके सोसत एका महिलेने अखेर प्लॅटफॉर्मवरच जीव सोडला. मात्र तिच्या मृतदेहाजवळच असलेल्या तिच्या लहानग्या बाळाला मृत्यू हे सत्य अजून माहितीच नसावे. आपली आई प्लॅटफॉर्मवरच झोपली आहे, असे समजून हे बालक आपल्या मातेला जागे करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होते.
दरम्यान, बिहारच्या मुजफ्फरपूरमधील रेल्वेप्लॅटफॉर्मवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेता शाहरुख खानने या मुलांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याच्या मीर फाउंडेशनने या मुलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मीर फाऊंडेशनने या संदर्भात एक ट्विट करत या चिमुकल्यांना मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे आम्ही या मुलांची जबाबदारी घेतोय, असं त्यांनी म्हटलं आहे.