61 ते 70 वयोगटातील सर्वाधिक : 2 हजार 209 जणांच्या मृत्यूची नोंद
पुणे – शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच मृत्यूची संख्याही वाढू लागली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मृत्यूचा कहर पहायला मिळाला. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंड यासह अन्य आजार असलेल्यांचा सर्वाधिक मृत्यू झाले. विशेषत: 51 ते 80 या वयोगटातील ज्येष्ठांचा मृत्यूची संख्या अधिक आहे. त्यामध्ये 61 ते 70 या वयोगटातील सर्वाधिक 2 हजार 209 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
पुण्यात एप्रिल महिन्यात पहिला करोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर मागील सात महिन्यात (15 ऑक्टोबरपर्यंत) तब्बल 7 हजार 335 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात 61 ते 70 या वयातील ज्येष्ठ नागरिकांचा करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाला आहे.
त्यापाठोपाठ 51 ते 60 या वयोगटातील 1 हजार 613 तर 71 ते 80 या वयोगटातील 1 हजार 568 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक साठीच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण हे 59 टक्क्यांपर्यंत आहे. तर 31 ते 40 वयातील पाच टक्के तर 41 ते 50 या वयातील 12 टक्के तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
एकूण मृतांमध्ये सर्वाधिक 81.6 टक्के रुग्णांचा मृत्यू हा मूत्रपिंड, मधुमेह, रक्तदाब, तसेच अन्य आजारांमुळे झाला. तर 18.4 टक्के रुग्णांना कोणताही आजार नसताना त्यांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. एकूण मृतांमध्ये 31 टक्के महिला तर 59 टक्के पुरुषांचा समावेश आहे.
सर्वाधिक मृत्यू पुण्यात…
जिल्ह्यातील पुणे शहरात सर्वाधिक 4 हजार 68 जणांचा मृत्यू झाले. मात्र, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने 3 हजार 983 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली केली. तर, शहराबाहेरून पुण्यातील रुग्णालयांमध्ये आल्यावर मृत्यू झाल्याची नोंद वेगळी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 1 हजार 457 जणांचा, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1 हजार 627 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. तर पुणे आणि खडकी कॅंटोन्मेंटमध्ये प्रत्येकी एक टक्का मृत्यू झाला आहे.