जिनिव्हा: संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) चे प्रमुखांनी देखील कोविड-19 महामारीचा प्रसार ‘अत्यंत वेगाने’ होत असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आल्याचे सांगत त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटले आहे की, नवीन कोरोना केसेसमधील अर्ध्या केसेस या उत्तर आणि दक्षिणी अमेरिका खंडातील आहेत तर दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियात देखील कोरोनाचा प्रभाव मोठा आहे.
टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटले आहे की, आता आपण नवीन आणि धोकादायक टप्प्यावर आहोत. महामारीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची अजूनही आवश्यकता आहे. अनेक लोक घरात राहून निराश आहेत तर काही देश बंधने उठवण्यासाठी उत्सुक आहेत. टेड्रोस यांनी सांगितले who-sकी, कोरोना व्हायरस अजूनही अत्यंत वेगाने पसरत आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि हात धुण्यासारख्या गोष्टी कटाक्षानं पाळणे गरजेचे आहे. ते म्हणाले की, मृतकांची संख्या खासकरुन निर्वासितांमध्ये जास्त असेल. यातील 80 टक्क्यांहून अधिक विकसनशील देशांमध्ये राहात आहेत.
वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार लाख 61 हजारांवर पोहोचली आहे. तसेच 46 लाख 20 हजारांहून अधिक लोक ठिक झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक आहे.