कराड -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने शेतकरी सभासदांना दर्जेदार फळझाडांची रोपे दरवर्षी योग्य दरात उपल्बध करून दिली जातात. या उपक्रमांतर्गत कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सभासद शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, पांडूरंग होनमाने, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, माजी उपसरंपच मनोज पाटील, मुकेश पवार, फायनान्स मॅनेजर, सी. एन. मिसाळ, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी उपस्थित होते.
शेतकरी संवाद मेळावे, अल्प दरात द्रवरूप जिवाणू खते, सेंद्रीय खते, माती परिक्षण, मोफत साखर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऊसनोंदी, सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी जयवंत आदर्श कृषियोजना यासारखे उपक्रम राबवित आहे. याबरोबरच कार्यक्षेत्रातील सभासदांना कारखान्याकडून दर्जेदार फळझाडांची रोपे उपल्बध करून देण्यात येत आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथूनही फळझाडांची रोपे आणली आहेत. यात हापूस, केशर आंब्याची रोपे, बाणवली नारळ, टी. डी. नारळ, ऑरेंज डॉर्फ नारळ, कालीपत्ती चिकू, साईशरबती लिंबू, लखनऊ पेरू, सफेद पेरू, बाळानगर सिताफळ, आवळा ही फळझाडांची तसेच काळीमिरी, दालचिनी ही मसाला झाडांची रोपे योग्य दरात उपलब्ध होणार आहेत.