ठाणे – भिवंडी तालुक्यातील खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात तब्बल 62 वृद्धांना करोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील खडवली येथे नदीकिनारी मातोश्री वृद्धाश्रम असून त्या ठिकाणी सुमारे शंभरहून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत.
एकीकडे जिल्ह्यात विशेषतः भिवंडी शहर ग्रामीण भागात करोना आटोक्यात आला असल्याचे दिसत आहे. भिवंडी शहरातही शनिवारी (27 नोव्हेंबर) दिवसभरात केवळ 1 रुग्ण आढळून आला. तर संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये 5 रुग्ण आढळून आले.
त्यातच मागील आठवड्यात या आश्रमातील काही जणांना ताप आल्याने उपचार सुरू केले. यात एका व्यक्तीची करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह निघाल्याने खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी केली.
ज्यानंतर 62 वृद्धांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले. आता या सर्वांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महिती वृद्धाश्रम व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली आहे.