पुणे – ग्रामीण भागात मागील आठ दिवसांत 1 हजार 295 बाधित सापडले. त्यामध्ये हवेली तालुक्यात सर्वाधिक 490 बाधित सापडले असून, जवळपास 27.1 टक्के बाधित एकट्या हवेली तालुक्यातील आहे. तालुक्याचा बहुतांश भाग शहरी भागात येत असल्याचे पहिल्यापासूनच येथील बाधित संख्या वाढलेली आहे. तर, शिरूर, बारामती आणि जुन्नर तालुक्यात बाधित संख्या शंभरच्या पुढे असून, या संख्येचा आलेख अजूनही वाढताच आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीला (दि. 18 ते 24 फेब्रुवारी) या आठवड्यात ग्रामीण भागातील आकडेवरीवर लक्ष दिले तर तब्बल तेराशेने बाधित संख्या वाढली आहे. 12 हजार 577 नमुने तपासणीतून ही बाधित संख्या असून, बाधित सापडण्याचे प्रमाण 10.3 इतके आहे. तर, मागील पाच दिवसांत (25 फेब्रुवारी ते 1 मार्च) ग्रामीण भागात नव्याने 1 हजार 254 बाधित सापडले आहेत. यावरून ग्रामीणमधील बाधित सापडण्याचे प्रमाण वाढतच आहे.
या वाढत्या संख्येत हवेली तालुक्यात 490 बाधित आहे. तालुक्याचा बहुतांश भाग शहरी भागात येत असल्याचे पहिल्यापासूनच येथील बाधित संख्या वाढलेली आहे. त्यापाठोपाठ शिरूर तालुक्यात 167 नवीन बाधित सापडले आहेत.
बारामतीमध्ये 120 तर जुन्नरमध्ये 105 बाधितांची नोंद झाली आहे. सर्वात कमी वेल्हा येथे 4 आणि भोरमध्ये 6 बाधित संख्या आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये 86, दौंडमध्ये 86, मुळशीत 73, इंदापूरला 69, खेडमध्ये 62, पुरंदर 44 तर मावळमध्ये 21 बाधित सापडले आहेत.