नवीन लाइन, स्थानक विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद
पुणे – केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे विभागाला विविध विकासकामासाठी 15 हजार 554 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. त्यातील केवळ 1 हजार 132 कोटी रुपयांचा निधी पुणे रेल्वे विभागातील नवीन लाइन, स्थानक विकास, डबल लाइन यासह अन्य विकासकामांसाठी देण्यात आला आहे.
पुणे विभागातील बारामती ते लोणंद या 54 किलोमीटर अंतरासाठी 330 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. तसेच नगर-बीड-परळी वैजनाथ या 250 किलोमीटर अंतरासाठी 275 कोटी रूपयांचा निधी दिला आहे.
रेल्वे मार्गाचे डबलिंग तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या कामामध्ये पुणे-मिरज-लोणंद या 467 किलोमीटरसाठी 200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर दौंड-मनमाड डबलिंगच्या 247 किलोमीटर कामासाठी 300 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
पुणे स्टेशनवर लवकरच 24 ते 26 कोचची ट्रेन उभी राहणार…
पुणे रेल्वे स्थानकावरून राज्यासह देशाच्या कानाकोपर्यात प्रवासी जातात. दररोज सव्वा लाखांवर प्रवासी येथून ये-जा करतात. त्यामुळे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी देण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकावर 24/26 डबे असलेल्या ट्रेनच्या फ्लॅटफाॅर्म कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच हडपसर टर्मिनल विकासासाठीही 2 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे.