पेठ -सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कुरवंडी येथील 2 करोनाबाधित असताना थुगाव व पेठ येथे नव्याने प्रत्येक 1 असे एकूण दोन रुग्ण आढळल्याने सातगाव पठार भागातील नागरिकांच्या दृष्टीने चिंता वाढली आहे.
पेठ गावात पहिले 7 करोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने एकसारखे गाव बंद ठेवून अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यात पुन्हा नव्याने एक 72 वर्षाच्या आजी करोनाबाधित निघाल्याने पेठकरांची चिंता वाढली आहे. प्रशासनातर्फे बाधित कुटुंब आणि त्यांच्या निकट आलेले यांचे स्वॅब घेण्याची तयारी कुठे तरी चालू असताना अनेकजण ह्या गोष्टीला विरोध करताना दिसत आहेत.
सातगाव पठार भागातील अनेक तरुण चाकण भोसरी येथील एमआयडीसी भागांमध्ये कामाला जात असून कुरवंडी 2, पारगावतर्फे खेड 1, थुगाव व पेठ येथील प्रत्येकी 1 असे सापडलेले रुग्ण हे चाकण कंपनीमध्ये कामाला जात होते. या भागातील अनेक लोक आजही बिनधास्त बाहेर फिरताना दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सचे पालन करताना दिसून येत नाही.