इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या नव्या राजकीय नकाशाला मंजुरी दिली आहे. या नकाशात भारत प्रशासित काश्मीरच्या भूभागाला पाकिस्तानच्या हद्दीत दाखवण्यात आलं आहे. तसेच लडाख आणि गुजरातमधल्या जुनागडचा भाग सुद्धा पाकिस्तानने त्यांच्या नकाशात दाखवला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः पाकिस्तानच्या सरकारी टीव्हीवर येऊन याची माहिती दिली आहे.
पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाच्या ट्विटर हॅंडलवरून नव्या नकाशाचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या नव्या राजकीय नकाशाला मंजुरी मिळाल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या इतिहासातील हा ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही जगासमोर पाकिस्तानचा नवा राजकीय नकाशा सादर करत आहोत. मंत्रिमंडळाने या नकाशाला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानातील शाळा आणि महाविद्यालयांमध्येही या नकाशाचा वापर केला जाईल. असे नवा राजकीय नकाशा जाहीर करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.
गेल्यावर्षी 5 ऑगस्टला भारताने जारी केलेल्या नकाशाला हे उत्तर आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.