नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. आरोग्य सुविधांअभावी अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अनेक ठिकाणी रक्ताची नाती पाठ फिरवाताना दिसत आहेत. अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक धजावत नाहीत. अशावेळी महापालिकेचे किंवा सरकारी कर्मचारी अंत्यसंस्कारंच काम करतात. मात्र हरियाणा येथे बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणारा महापालिकेचा कर्मचारीच करोनाचा बळी ठरला आहे.
प्रवीण कुमार मृत व्यक्तीचे नाव असून त्यांना करोना संसर्ग झाला होते. संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर केवळ दोन दिवसांतच त्यांचे निधन झाले. दुर्दैव म्हणजे, दिवंगत प्रवीण करोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्यासाठी बेड मिळवण्यासाठी तीन ते चार तास पायपीट करावी लागली होती.
हरियाणाच्या हिसार महानगरपालिकेत काम करणारे प्रवीण कुमार येथील कर्मचारी संघटनेचे प्रमुख होते. त्यांनी आतापर्यंत 300 हून अधिक कोरोना-संक्रमित रूग्णांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले होते. सोमवारी उशिरा त्यांनी हिसारच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी सकाळी ऋषी नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रवीण यांना करोनाची लागण झाल्यानंतर बेड उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे त्यांना मॉडेल टाऊनमधील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. यासाठी पालिका आयुक्त अशोक गर्ग यांना हस्तक्षेप करावा लागला होता. मात्र त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आलं.
महानगरपालिका आयुक्त अशोक कुमार गर्ग म्हणाले की, महामंडळ कर्मचारी प्रवीण कुमार यांचे आकस्मिक निधन अत्यंत वेदनादायक आहे. या कठीण काळात त्यांनी करोना योद्धा म्हणून सेवा केली आहे.