पुणे – संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असून विविध पातळयांवर कोरोनाविरुद्ध लढा सुरु आहे. वाढती रुग्ण संख्या आणि अपुरी वैद्यकीय संसाधने हा चिंतेचा विषय बनला आहे. अशा या कठीण परिस्थितीत अनेक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. अशातच ‘सेव्ह दि चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने पुणे आणि पिंपरीचिंचवड शहरासाठी ६० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देउन या कार्यात मोलाचा सहभाग नोंदवला आहे.
‘सेव्ह दि चिल्ड्रन – बाल रक्षा भारत’ ही आंतरराष्ट्रीय संस्था भारतातील १७ राज्यामध्ये बालकांचे हक्क व अधिकार या विषयात काम करते. महाराष्ट्रात मुंबई पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, सिन्नर, इगतपुरी या विभागात संस्थेच्या माध्यमातून बालकांशी निगडित अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर बालकांच्या शिक्षणात निर्माण झालेल्या शैक्षणिक समस्येच्या अनुषंगाने आणि मुलांची शिक्षणासोबतची नाळ टिकून ठेवण्यासाठी या संस्थेने भरीव योगदान दिले आहे.
कोरोना संकटात ऑक्सिजनचा आणि इतर संसाधनांचा प्रश्न गंभीर होत असतांना सेव्ह दि चिल्ड्रन संस्थेने देशात विविध गरजेचे यांत्रिक उपकरणे वाटपाचे कार्य हाती घेतले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ५०० ऑक्सिजन काँसंट्रेटर मागवण्यात आले. मुंबई विमानतळावरून देशाच्या विविध भागात हि उपकरणे पोहचवण्यात आली आहेत. पुणे महानगरपालिकेत ६० उपकरणे आयुक्त रूबल अग्रवाल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका १० उपकरणे आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी रुबल अग्रवाल, (आयुक्त पुणे मनप), राजेश पाटील (आयुक्त, पिंपरी चिंचवड मनपा),डॉ. संजीव वाव्हरे, (सहायक वैद्यकीय अधिकारी पुणे महानगरपालिका), गोविंद बडम, निकम, अपर्णा जोशी (सहायक व्यवस्थापिक, सेव्ह दि चिल्ड्रन), हरीश वैद्य (सहायक व्यवस्थापक, सेव्ह दि चिल्ड्रन), अमिताव बराक (सहायक व्यवस्थापक सेव्ह चिल्ड्रन) उपस्थित होते.
“बालकांचे हक्क आणि अधिकार यासाठी ‘सेव्ह दि चिल्ड्रन’ सातत्याने विविध स्तरावर काम करत आली आहे. कोरोनाच्या या संकट काळात संस्थेने मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सातत्याने विवीध उपक्रम राबवले आहेत. वैद्यकीय व्यवस्थेवर आणि संसाधनांवर ताण असतांना संस्थेने ऑक्सिजन काँसंट्रेटर देउन खारीचा वाटा उचलला आहे. यापुढेही जे शक्य होईल ते करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील.”
– इप्सिता दास (वरिष्ठ व्यवस्थापक, सेव्ह दि चिल्ड्रन)