आतापर्यंत पाचशे पोलिसांना करोनाची लागण
पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बाधित पोलिसांची संख्या 504 वर जाऊन पोचली आहे. करोनामुक्त झालेल्या पोलिसांचा करोना फायटर नावाचा एक ग्रुप तयार केला आहे. करोनामुक्त झालेले कर्मचारी करोनाबाधित पोलीस सहकाऱ्यांसाठी सदैव तत्पर असल्याचे दिसून येत आहे. बाधित कर्मचाऱ्यास काही जरी अडचण आल्यास नातेवाइकांपूर्वी करोनामुक्त कर्मचारी मदतीसाठी धावून जातात.
पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एखादा कर्मचारी करोना बाधित झाल्यास त्यास करोना फायटर ग्रुपमध्ये सहभागी केले जाते. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ आणि सहायक आयुक्त आर. आर. पाटील हे या ग्रुपचे प्रमुख आहेत. पोलिसांनी करोना सेलची स्थापना केली आहे.
ज्या करोना बाधित रुग्णांना काहीच लक्षणे नाहीत त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते. मात्र ज्या कर्मचाऱ्यांना करोना बाधित झाल्यावर त्रास होतो त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. पोलीस अधिकारी स्वतः तीन वेळा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून बाधित कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी करून त्यास कोणती औषधे हवी आहेत, याची विचारपूस करतात.
रुग्णासही ठाऊक नसते, त्यास काय हवे आहे
एखाद्या करोनाबाधित रुग्णास रेमेडिसीवेर या इंजेक्शनची किंवा प्लाझमाची गरज असल्यास संबंधित रुग्णालयातील डॉक्टर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात. मग पोलीस अधिकारी अवघ्या अर्धा तासात डॉक्टरांनी सांगितलेली औषधे रुग्णालयास उपलब्ध करून देतात. रुग्णास कशाची आवश्यकता आहे, हे अनेकदा त्या रुग्णास किंवा त्याच्या नातेवाइकांनाही ठाऊक नसते.
सध्या अकरा रुग्णांवर उपचार
आत्तापर्यंत 504 पोलीस कर्मचारी करोना बाधित आले आहेत. सध्या फक्त 11 जणांवरच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक कंपन्या पोलिसांना मदत करण्यास तयार आहेत. मात्र आता पोलीस मास्क, सॅनिटायझर किंवा इतर वस्तू घेत नाहीत. त्याऐजवी पोलीस आता रेमेडिसीवेर हे इंजेक्शन देण्यास सांगतात. हे इंजेक्शन कोठे आणि किती रुपयांना मिळेल, हे देखील कंपन्यांना सांगतात. आत्तापर्यंत 84 रेमेडिसीवेर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला आहे.
त्यापैकी 60 इजेक्शन पोलीस कर्मचाऱ्यांना दिले आहेत. उर्वरित इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहेत. एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यास प्लाझमाची आवश्यकता असल्यास पोलीस अधिकारी करोना फायटर या ग्रुपवर संबंधित कर्मचाऱ्याचा रक्तगट टाकतात. त्यानंतर अनेक पोलीस कर्मचारी आपल्या सहकाऱ्यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येतात.
अनेकांच्या समस्या सोडविल्या
रुग्णालयात दाखल केलेल्या काही कर्मचाऱ्यांना डॉक्टर आपल्या आजाराकडे लक्ष देत नाहीत, असे वाटते. ते याबाबतची तक्रार करोना फायटर ग्रुपवर करतात. अशा कर्मचाऱ्याला वरिष्ठ धीर देतात. संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांशी वरिष्ठ संपर्क साधून योग्य लक्ष देण्याबाबत सांगतात.