हरिद्वार – हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आढाव्यानंतर कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला आहे.
करोनाची दुसरी लाट देशात आलेली असतानाच्या काळातच कुंभमेळा होत असल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी करण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंडच्या सचिवांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.
12 राज्यांतून भाविक हरिद्वारमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याला येऊ शकतात. तर दुसरीकडे कुंभमेळा जवळ येत असतानाच दररोज 10 ते 12 स्थानिक नागरिक आणि तितकेच भाविक करोनाबाधित आढळून येत असल्याचे केंद्रीय पथकाने नमूद केले आहे.
करोनाबाधित आढळून येत असल्याने पॉझिटिव्ही रेट वाढण्याची भीती आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्यामुळे दिवसाला 50 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि पाच हजार आरटीपीसीआर चाचण्या पुरेशा नाहीत.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करोना चाचण्या वाढवण्यात याव्यात. त्याचबरोबर भाविकांबरोबरच स्थानिक नागरिकांच्याही चाचण्या करण्यात याव्यात, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंड सरकारला सांगितले आहे.