नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम आणि त्यांचे खासदार पुत्र कार्ती यांना बुधवारी येथील विशेष न्यायालयाने समन्स बजावले. त्यांना आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणी 7 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
चिदंबरम यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रिपदाची धुरा असताना संबंधित प्रकरण घडले. आयएनएक्स मीडिया ग्रुपला 305 कोटी रूपयांचा परकी निधी मिळवण्यासाठी फॉरीन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाने 2007 या वर्षी मंजुरी दिली. त्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यावरून सीबीआयने मे 2017 मध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉण्डरिंगचा स्वतंत्र गुन्हा नोंदवला.
त्यानंतर सीबीआयने 21 ऑगस्ट 2019 ला चिदंबरम यांना अटक केली. त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. चिदंबरम यांना 22 ऑक्टोबर 2019 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी जामीन मंजूर केला. तर, ईडीच्या प्रकरणात त्यांना 4 डिसेंबर 2029 ला जामीन मिळाला. आता ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन विशेष न्यायालयाने चिदंबरम पिता-पुत्राला समन्स बजावले आहे.