जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आदेश; संशयितांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्याचा संस्थेचा प्रस्ताव
नगर – बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचालित जामिया मोहम्मदिया मदरसा करोना विलगीकरण कक्षासाठी (क्वारंटाईन वॉर्ड) ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज दिले. सामाजिक भावना म्हणून संस्थेतर्फेच तसा प्रस्ताव काल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता. विलगीकरणातील रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी देखील जामिया मदरसातर्फे दाखविण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या लढ्यात सामाजिक भावनेतून योगदान देण्यासाठी मदरसाची इमारत विलगीकरण कक्षासाठी (आयसोलेशन) देण्याचा प्रस्ताव मदरसाच्या विश्वस्त मंडळाने सोमवारी (दि.6) आपत्ती व्यवस्थापन कक्षात दिला होता. मदरसाचे व्यवस्थापक सय्यद सादिक गफ्फार, विश्वस्त मतीन सय्यद, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, आसिर पठाण यांनी त्याबाबत चर्चा करुन ही इमारत शहराबाहेर असल्याने त्याचा विलगीकरण कक्षासाठी चांगला उपयोग होईल, अशी भूमिका मांडली होती.
या मदरसामध्ये मुस्लिम समाजातील मुले धार्मिक शिक्षण घेतात. त्यांना सुट्टी दिलेली असल्याने इमारत रिकामी असल्याचे त्यांनी सांगितले होते. करोना विरोधात सुरु असलेल्या वैद्यकीय संघर्षात ही इमारत अगदीच शहराबाहेर असल्याने तेथून पुन्हा संसर्ग होण्याची भीती कमी होईल. तसेच तेथे मुबलक जागा उपलब्ध असल्याने त्याचा प्रशासनावर ताण देखील येणार नसल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर तातडीने विचार करुन संस्थेच्या सूचनांनुसार तेथे विलगीकरण कक्ष उभारण्याचा तातडीने निर्णय घेतला. पुढील आदेश होईपर्यंत ही इमारत जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तेथे आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.