“हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील असल्याचे उघड
पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊवर
पिंपरी – मागील चार दिवसांनतर आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहरात नवीन एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्यांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील हा पुरुष रुग्ण आहे. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे.
दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात आलेल्यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि.2) स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एकाला शुक्रवारी (दि.3) कोरोनाची लागण झाली. त्यानंतर शनिवारी (दि.4) एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये दिल्लीतून आलेल्यांच्या कॉन्टॅक्टमधील चार जण होते. त्यानंतर आज बुधवारी (दि. 8) त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, शहरात आजपर्यंत 20 रुग्ण आढळले होते. त्यापैकी बारा बरे झाले आहेत. आठ बाधित रुग्णांवर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु होते. त्यामध्ये आज आणखी एकाची भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नहीन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 587 व्यक्तींचे कोरोना तपासणीकरिता घशातील द्रावांचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आजअखेर 541 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित अहवाल प्रलंबित आहेत. तसेच आज (बुधवारी) 26 कोरोना संशयितांना वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.
शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या 1,873 आहे. या सर्वांनी किमान 14 दिवसांसाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
….अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.
करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी त्याची संक्रमण साखळी तोडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शहरातील काही भाग सील करण्यात आले आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये. सोशल डिस्ट्न्सिंगचे पालन करावे, मास्कचा वापर करावा.