नोव्हाव्हॅक्‍स बायोटेक-सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया यांच्यात महत्वपुर्ण करार

करारानुसार सिरमकडे नोव्हव्हॅक्‍सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार

नवी दिल्ली: जगाला हतबल करून सोडणाऱ्या करोनाला रोखण्यासाठी जगभरातून लस संशोधन करण्यात येत आहे. काही लसींचे संशोधन हे शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. त्यातच करोना विरोधात विकसित केलेल्या लसीचा पुरवठा आणि परवाना देण्यासंदर्भात नोव्हाव्हॅक्‍स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियासोबत एक महत्वपूर्ण करार केला आहे. नोव्हाव्हॅक्‍सने नुकतीच ही माहिती दिली. या करारामुळे नोव्हव्हॅक्‍सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार सिरमकडे असणार आहेत.

नोव्हाव्हॅक्‍सच्या एसईसी फाईलनुसार, नोव्हाव्हॅक्‍स अमेरिकन लस उत्पादक कंपनी आहे. 30 जुलै रोजी हा करार झाला. नोव्हाव्हॅक्‍सने विकसित केलेल्या लसीचे प्राथमिक स्तरावर अपेक्षित निकाल मिळाले आहेत. सप्टेंबरपासून नोव्हाव्हॅक्‍स तिसऱ्या फेजची चाचणी सुरु करेल. एका इंग्रजी संकेतस्थळावर याविषयी माहिती दिली आहे.

अमेरिकेने करोनावरील लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्‍स बायोटेक या कंपनीला 1.6 अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती. एखाद्या कंपनीला लस निर्मितीसाठी देण्यात येणारा आतापर्यंतचा हा सर्वाधिक निधी आहे. अमेरिकेने अन्य कंपन्यांना सुद्धा करोनावरील लस निर्मितीसाठी निधी दिला आहे.

नोव्हाव्हॅक्‍स प्रमाणे सिरमकडे ऑक्‍सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन आणि पुरवठयाचे अधिकार आहेत. भारतात लवकरच सिरमकडून ऑक्‍सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु होणार असून त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.