केंद्राकडून दखल : दोन आठवड्यांपूर्वी 5.6 असलेला दर 5 टक्क्यांवर
पुणे – शहरातील करोनाबाधितांचा मृत्यूदर आणखी घटला. दोन आठवड्यांपूर्वी 5.6 टक्के असलेला हा दर आता 5 टक्क्यांवर आला आहे. केंद्र शासनाने त्याची दखल घेतली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली. राज्याच्या मुख्य सचिवांसह प्रमुख महापालिकांच्या आयुक्तांशी सचिवांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी महापालिकेतील करोना रुग्णांची सद्यस्थिती तसेच जून महिन्यातील संभाव्य स्थितीची माहिती दिली.
आयुक्त गायकवाड म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडून नियमितपणे शहरातील सद्यस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यावेळी बाधित रुग्णांच्या तुलनेतील मृत्यूचा दर कमी करण्यात महापालिकेस यश आल्याची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने मागील काही आठवड्यात शहरातील मृत्यूदर कमी झाल्याची माहिती देण्यात आली. हा मृत्यूदर 30 एप्रिलपासून शहरात सरासरी 5.60 टक्के होता. तो 27 मे अखेर 5 टक्के झाला आहे. त्यामुळे शहरातील गंभीर करोनाबाधितांच्या उपचार पद्धती तसेच नियोजनाने हा मृत्यूदर कमी झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. त्याची दखल केंद्राने घेतली असून हा दर आणखी कमी करण्याच्या सूचना केल्याचे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले.
रुग्ण संख्या नियंत्रित करण्यासाठी येत असलेल्या उपाययोजना आणि जून महिन्यात संभाव्य रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती केंद्रीय सचिवांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.