नारायणगाव -जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावात मुंबईहून आलेल्या करोनाबाधित 35 वर्षीय विवाहित महिलेचा 6 वर्षीय मुलगा करोना बाधित असल्याचे आज (दि. 28) वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे. तसेच 5 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.
मांजरवाडी गावात ही महिला करोना बाधित असल्याचे दि. 25 ला निष्पन्न झाले होते. त्यावेळी आरोग्य विभागाने या महिलेच्या संपर्कातील आई, वडील, आजी, भाऊ व दोन मुले असे 6 जणांना जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचे नमुने दि. 26 ला पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे तपासणी अहवाल आज (दि. 28) आला असून त्यामध्ये 6 पैकी 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह आला आहे.
यामध्ये करोनाबाधित महिलेचा 6 वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे मांजरवाडीत करोना बाधितांची संख्या 2 झाली आहे. दि. 26 पासून संपूर्ण मांजरवाडी गाव 14 दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून गावापासून 5 किलोमीटरचा परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे.