कंटेन्मेंट झोनबाहेर सापडले 49% बाधित
पुणे – लॉकडाऊन 5.0 सुरू होतानाच, शहर पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉक-1 ची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे व्यवसाय तसेच व्यापार पूर्वपदावर येत असतानाच वाढलेल्या गर्दीचा अखेर करोनाने फायदा घेतला असून, आतापर्यंत ठराविक हॉटस्पॉटमध्ये मर्यादित असलेल्या करोनाने आपली वेस ओलांडली आहे.
दि. 1 ते 11 जून या 11 दिवसांच्या कालावधीत शहरात 2 हजार 52 नवे बाधित सापडले असून त्यातील तब्बल 49 टक्के (995) बाधित प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सापडले आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रात 1,057 (51 टक्के) बाधित सापडले आहेत.
महापालिकेने लॉकडाऊन शिथिल करण्यास 3 मेपासून सुरुवात केली. त्यात कंटेन्मेंट झोनवगळता उर्वरित शहरात लॉकडाऊन शिथिल केले. 3 मेपासून हा भाग शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ 3 टक्के आहे. त्यामुळे उर्वरित 97 टक्के शहरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल होऊन वर्दळ वाढत गेली आहे. परिणामी, करोनाचा प्रसार आता प्रतिबंधित क्षेत्राबाहेर होत आहे. दि. 3 ते 17 मेदरम्यान शहरात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर सुमारे 25 टक्के बाधित प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सापडले होते. तर दि.17 ते 31 मेदरम्यान प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बाधितांचा आकडा 37 टक्के होता. तो गेल्या 11 दिवसांत एकूण बाधितांच्या तुलनेत तब्बल 49 टक्के झाला आहे.
नवीन झोपडपट्ट्या हॉटस्पॉट
शहरात प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर 49 टक्के करोनाबाधित आढळले असले, तरी ते काही ठराविक भागातच आहे. त्यामुळे हे परिसर सील केले जात आहेत. पूर्वीप्रमाणेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पसरलेला करोना नवीन झोपडपट्ट्यांमध्ये पाय पसरत आहे. त्यात जनता वसाहत, दांडेकरपूल, केळेवाडी, पानमळा, बोपोडी तसेच काही एसआरए इमारतींमध्ये नव्याने बाधितांचा आकडा वाढला आहे. तर सोसायट्यांचा परिसर असलेल्या भागात बाधितांची संख्या अजूनही मर्यादितच आहे.