चंदीगढ – करोनाने सगळ्याच राज्यांची चिंता वाढवली असताना पंजाबमध्ये हादरवणारी बातमी आहे. त्या राज्यात जे नवे करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, त्यातील 81 टक्के रूग्णांमध्ये करोनाचा ब्रिटिश स्ट्रेन आढळून आला आहे.
दरम्यान, राज्यातील तरूणांनाही सरसकट लस देण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी मुख्यमंत्री कॅप्टन अमिंरंदर सिंग यांनी केली आहे.
अमरिंदर यांचे प्रधान माध्यम सल्लागार रविन ठकुराला म्हणाले की करोनाचा युवकांनाही मोठा फटका बसतो आहे. आता साठ पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांना लस देण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे.
मात्र तरूणांनाही लस दिली जाण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान, राज्यात जे 401 नमूने घेण्यात आले होते, त्यातील 81 टक्के नमून्यांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन आढळून आला आहे व ते काळजीचे माठे कारण आहे. हा विषाणू अत्यंत घातक असून सगळ्यांनी करोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन अमरिंदर यांनी केले आहे.