गृहमंत्रालयाच्या परिपत्रकामुळे आणखी किती गुन्हेगार बाहेर पडणार
– संजय कडू
पुणे – करोना उद्रेक झाल्यानंतर त्याचे लोण कारागृहातही पोहोचले होते. तेथे करोनाने बस्तान मांडल्यास मोठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकली असती. याचा विचार करून राज्य सरकारने कच्चे व कमी गंभीर गुन्ह्यांतील कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला. यासाठी गृहविभागाने एक परिपत्रक काढून सात वर्षांपर्यंत शिक्षा लागलेल्या गुन्हेगारांना (अपवाद वगळता) तात्पुरता जामीन किंवा पॅरोल देण्याचा निर्णय घेतला. हे परिपत्रक काढताना नियमाप्रमाणे एक समिती नेमून अहवाल तयार केला.
अहवाल तयार करताना गुन्हेगावर बाहेर पडल्यावर त्यांच्यावर नियंत्रण कसे ठेवायचे या महत्त्वाच्या विषयांकडेच दुर्लक्ष केले. या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादे खास पथक तयार करणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांनी राज्यात हैदोस मांडला आहे.
तात्पुरते सुटलेल्यांकडून गंभीर गुन्हे
तात्पुरता जामीन मिळाल्यानंतर बाहेर आल्यावर आरोपी पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झालेले दिसत आहेत. त्यांच्याकडून खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे केले जात आहेत. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांनी मागील तीन ते चार महिन्यांत तीन खून, तीन ते चार खुनाचे प्रयत्न, जबरी चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे केले. यात त्यांना पुन्हा अटक झाली. मात्र, दर आठवड्याला गुन्हेगार जामिनावर सुटत असल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जामिनावर सुटलेल्यांवर सर्व्हिलन्स
एखादा सराईत गुन्हेगार जामिनावर सुटल्यावर त्याला संबंधित पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेत हजर व्हायला सांगितले जाते. त्याला जामिनावर सुटला म्हणजे काहीही करता येणार नाही. जामिनाच्या अटी व नियमांचे पालन करावे लागेल, असे समजावून सांगितले जाते. यानंतर त्याचा सध्याचा राहण्याचा पत्ता, मोबाइल नंबर, नातेवाईकांचे नंबर आदी माहिती घेतली जाते. गस्ती पथकातील पोलिसांकडून त्याच्या घराला नियमित भेट दिली जाते. तो तेथे राहातो का नाही हे पाहिले जाते. गुन्हे शाखा अनेकदा अचानक मोहीम राबवून सराइतांची झाडाझडती घेते.
जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांकडून पुन्हा गुन्हे होत आहेत. यासाठी त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येत आहे. त्यांच्या हालचालींची नियमित तपासणी होत आहे.
– संभाजी कदम, प्रभारी पोलीस उपायुक्त, गुन्हे