…त्यांच्या निश्‍चयापुढे करोनाही पराभूत

रानवडी वृद्धाश्रमातील 47 जणांची विषाणूंवर मात

– शंकर ढेबे

वेल्हे – करोना विषाणूंची लागण झाल्यावर भलेभले आपली आशा सोडून देत असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रानवडी येथील जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातील तब्बल 47 जणांनी करोनावर मात केली आहे. हे सर्व 47 वृद्ध बुधवारी (दि.21) 13 दिवसांनंतर ठणठणीत बरे झाल्याने वृद्धाश्रमामध्ये दाखल झाले आहेत.

हे 48 जण खूप वयस्कर असल्यामुळे आणि त्यातील काहींना तर बेडवरून हलतासुद्धा येत नव्हते. जवळपास सगळ्यांनाच विविध व्याधींनी जडलेले होते आणि अशात त्यांना करोनाची लागण होणे म्हणजे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनासमोर खूप मोठे आव्हानच होते.

ज्यावेळी पहिला वृद्ध पॉझिटिव्ह आला तेव्हा प्रशासनाने आणि आरोग्य यंत्रणेने तातडीने पावले उचलून भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, आरोग्य अधिकारी अंबादास देवकर, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार आणि त्यांच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेतला आणि वृद्धाश्रमातील 165 वृद्धांची तपासणी केली, त्यातील तब्बल 48 रुग्ण पॉझिटिव्ह आले. या सर्व रुग्णांची अवस्था इतकी गंभीर होती की त्यांना तेथून हलवता येणेसुद्धा अशक्‍य होते. त्यांच्यावर आहे येथेच उपचार करणे हे फार मोठे आव्हान आरोग्य यंत्रणे पुढे होते. आरोग्य यंत्रणेने हे आव्हान पेलत या सर्व वृद्धांना करोनामुक्‍त केले आहे.

आरोग्य, महसूल, पोलीस विभाग या सर्वांनी एकजुटीने रात्रंदिवस मेहनत घेत वृद्धांची काळजी घेऊन त्यांना या गंभीर आजारातून सुखरूप बाहेर काढत सर्वांत मोठे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे. वेल्ह्यात मनुष्यबळ कमी असतानाही आपत्तीच्या काळात वेल्हे प्रशासन अतिशय खडतर परिश्रम करत आहे. जिवाची पर्वा न करता रुग्णांची काळजी घेत आहे.
– शिवाजी शिंदे, तहसीलदार, वेल्हे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.