Cool Weather: राज्यासह देशभरात गुलाबी थंडीची चाहूल (Winter) लागली आहे. पण, दरवर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेने यंदा थंडी कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तसेच केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
केरळच्या समुद्र किनार्यालगत अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, कोकणसह राज्यातील तापमानात मागच्या काही दिवसांपासून बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोव्हेबर महिन्याची सुरुवात होताच तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवलीसह पनवेल आणि पालघरमध्येही पहाटे गुलाबी थंडीचा जोर वाढताना दिसून येत आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) कालच नोव्हेंबर महिन्याचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसारनोव्हेंबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानात घट होणार आहे, पण तुलनेने यंदा थंडी कमी राहणार आहे. त्यासोबतच पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. राज्यात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नोव्हेंबर महिनाच्या शेवटी मुंबई, ठाणेसह कोकणात थंडीचा जोर वाढणार आहे.अलनिनोच्या प्रभावामुळे देशातील बहुतेक भागात नोव्हेंबरमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात दक्षिणेकडील काही भागात, उत्तर-पश्चिमचा बहुतांश भाग आणि पूर्व-मध्य, पूर्व आणि ईशान्येकडील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज असून या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.