Hasan Mushrif : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मात्र आता मराठा आंदोलन आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या.
इतकेच काय तर राजकीय नेत्यांच्या घरावर देखील दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या गाडीवर देखील दगडफेक केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेनंतर आता हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
“आज माझ्या गाडीची तोडफोड झाली आहे. परंतु या प्रकरणी कोणावरही कठोर कारवाई करू नये, असे मी गृहखात्याला सांगणार आहे. मराठा आंदोलनाला नेतृत्व दिसत नाही. या तरूणांना आंदोलनाची दिशा समजावून सांगणे महत्वाचे आहे. आमदार स्वत:ची घरं जाळतील, गाड्या जाळतील असं होईल का? त्यामुळे या घटना कोण घडवून आणतंय ते बघणं गरजेचं आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “आमदारांची घरं जाळणं. त्यांचं कुटुंब घरात असताना दगडफेक करणं, हे अत्यंत दुदैवी आहे. अशा घटना घडता कामा नयेत. या अशा घटनांमुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे. लोकांची जी सहानुभूती या आंदोलनाला आहे. ती देखील निघून जातेय. याचा देखील या आंदोलकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे,” असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली आहे. याबाबत देखील हसन मुश्रीफ यांनी प्रति क्रिया दिली आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता वारंवार बैठका आणि चर्चा होत आहेत. आजही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी बोलावली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागेल, असं हसन मुश्रीफ म्हणाले.