पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या “वायसीएम’ रुग्णालयातील मेडिकलवरून आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये शनिवार (दि.23) रोजी तु-तु, मै-मै होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेले होते. इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण शांत झाले. मात्र, या प्रकरणावरून महासंघाच्या निवडणुकीची धग अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही गटाच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची मार्च 2022 रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष असलेल्या अंबर चिंचवडे गटावर बबन झिंजुर्डे गटाने मात करून महासंघावर सत्ता मिळवली. अत्यंत अटी-तटीच्या झालेल्या निवडणुकीत झिंजुर्डे गटाने बाजी मारल्यामुळे महासंघाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील वाद अद्यापही कायम आहे. तसेच या निवडणुकीचा वाद न्यायालयातही गेला होता.
न्यायालयाच्या निकालानुसार अंबर चिंचवडे गटाने वायसीएम रूग्णालयातील महासंघाच्या मेडिकलचा ताबा झिंजुर्डे गटाकडे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चिंचवडे गटाचे काही कर्मचारी शनिवार (दि.23) रोजी मेडिकलमधील औषधांचा साठा किती शिल्लक आहे, याची मोजणी करण्यासाठी गेले होते. मात्र, झिंजुर्डे गटातील कर्मचाऱ्यांनी 15 मार्च 2022 रोजी मेडिकल बंद करताना किती औषधांचा साठा शिल्लक होता, याचा अहवाल मागितला. यावरून दोन्ही गटातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये तु-तु, मै-मै होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यत गेले. मात्र, इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण शांत झाले. दोन्ही गटाच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
न्यायालयाच्या निकालानुसार 1 ऑगस्ट रोजी मेडिकलचा ताबा महासंघाला देण्यात येणार आहे. तत्पुर्वी औषधांचा साठा घेण्यासाठी आम्ही गेलो, असता महासंघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. 8 ते 10 जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
-अंबर चिंचवडे, माजी अध्यक्ष
महासंघाच्या मेडिकलमधील औषधांचा साठा 15 मार्च 2022 रोजी किती होता, याची आम्ही माहिती मागितली होती. त्यांनी आता स्टॉकची पाहणी करून सांगू, असे सांगितले. यावर तुमचे दोन आणि आमचे दोन कर्मचारी औषधांच्या साठ्याची मोजणी करतील, अशी मागणी केली. मात्र, त्यांनीच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
– बबन झिंजुर्डे, अध्यक्ष